
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढला आहे. याच दरम्यान जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमने एक मोठा निर्णय घेतला असून, स्टेडियममधून सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो हटवण्यात आले आहेत.
सवाई मानसिंग स्टेडियममधील ‘वॉल ऑफ ग्लोरी’ या भिंतीवर आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंचे फोटो लावले जातात. पाकिस्तानने या मैदानावर एक कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले होते, ज्यामध्ये २५ पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश होता. मात्र, राजस्थान क्रिकेट असोसिएशनने (RCA) आता या सर्व पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय केवळ क्रिकेटच्या पातळीवर नसून, भारताच्या सुरक्षेप्रती असलेल्या गंभीर भूमिकेचे प्रतिक मानला जात आहे. २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतरही अशीच कारवाई करण्यात आली होती. या खेळाडूंमध्ये पाकिस्तानसाठी ७९ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाचा देखील समावेश होता. कनेरियाने पाकिस्तान सरकारवर आणि दहशतवादावरील भूमिकेवर उघडपणे टीका केली होती. त्याच्यावरही भेदभाव झाल्याचे त्याने पूर्वी जाहीरपणे सांगितले होते.
भारत सरकार आणि विविध संघटनांकडून दहशतवादाविरोधात घेतल्या जात असलेल्या कठोर भूमिकेचा हा एक भाग मानला जात आहे. या निर्णयामुळे भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंधांवर अजून गडद सावट आल्याचे स्पष्ट दिसून येते.