
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई
पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतप्त वातावरण निर्माण झालं असताना, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भूमिकेची स्पष्टपणे मांडणी केली आहे. “देशावर संकट आलं तर आमचे मतभेद बाजूला ठेवून आम्ही पंतप्रधानांच्या सोबत उभे राहू,” असं ठाकरेंनी ठामपणे जाहीर केलं आहे. मुंबईतील शिवसेना भवनात झालेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी पक्षाचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “काश्मीर कालही आपलं होतं, आजही आपलं आहे आणि उद्याही आपलंच राहील. एकवेळ भाजप नसले तरी काश्मीर देशात कायम राहील. देशावर हल्ला झाला, तर आम्ही पंतप्रधानांसोबत आहोत. वैचारिक मतभेद असतील, पण राष्ट्राच्या सुरक्षेवर एकवाक्यता हवी.” पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाने घेतलेल्या काही निर्णयांवर टीका करत असतानाही, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारसोबत उभं राहायला हवं, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
याशिवाय, ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणावर चर्चा करणाऱ्या समितीच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरही ठाकरे यांनी भाष्य केलं. “निवडणुका पारदर्शक आणि स्वतंत्र वातावरणात व्हाव्यात. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निवडणूक प्रचारात उतरू नयेत,” अशी भूमिका त्यांनी मांडली. तसंच आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.