
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : नैसर्गिक समतोल साधण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान तंत्र अधिनियम (पीसीपीएनडीटी) कायद्याची ठोस अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी सोनोग्राफी, एमटीपी केंद्राची तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या.
जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, विधी समुपदेशक नंदिनी गायकवाड यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, गर्भवती महिलांची नोंदणी ते प्रसुति होईपर्यंत विविध टप्प्यांवर आरोग्य विभागाने संबंधित महिलेचे वेळोवेळी समुपदेशन करावे. सकस आहार, लोहयुक्त गोळ्या याबाबत आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांनी जनजागृती करावी. अवैध गर्भपात टाळण्यासाठी सीमेवरील तालुक्यांवर लक्ष केंद्रित करावे. याबाबत विविध स्तरांतून जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत दाखल न्यायालयीन प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती सादरीकरणातून दिली. जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या नियमित बैठका घेण्यात येत असल्याचे सांगून पीसीपीएनडीटी कायद्याच्या उल्लंघनाबाबत http://amchimulgimaha.in व 18002334475 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करता येत असल्याबाबतची माहिती त्यांनी दिली. http://amchimulgimaha.in या संकेतस्थळावर दाखल दोन्ही तक्रारी निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.