आटपाडी सूतगिरणी गैरव्यवहार प्रकरणी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक ; वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे दोषींवर कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश : आम. पडळकर यांची माहिती

0
1138
फोटो मुंबई : मंत्रालय येथे आटपाडी सूतगिरणी बाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थित बैठक पार पडली. बैठकीला उपस्थित आमदार गोपीचंद पडळकर, महादेव पाटील व वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी
फोटो मुंबई : मंत्रालय येथे आटपाडी सूतगिरणी बाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थित बैठक पार पडली. बैठकीला उपस्थित आमदार गोपीचंद पडळकर, महादेव पाटील व वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणी मध्ये झालेल्या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय, मुंबई येथे वस्त्रोद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

या बैठकीला वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव अंशु सिन्हा, उपसचिव श्रीकृष्ण पवार, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैणे, प्रादेशिक उपायुक्त उज्ज्वला पळसकर, सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) निलेश तिखाडे, कक्षाधिकारी तुषार शिंदे, तसेच बनपुरीचे माजी सरपंच तथा मजूर फेडरेशनचे मा.व्हा.चेअरमन महादेव पाटील उपस्थित होते.

 

आटपाडी सूतगिरणीच्या स्थापनेमागे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती हा मुख्य उद्देश होता. मात्र, गेल्या काही वर्षांत या संस्थेमध्ये आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. कामकाजातील अपारदर्शकता, निधींचा गैरवापर, बोगस व्यवहार, तसेच व्यवस्थापनातील ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती या बैठकीत सादर करण्यात आली.

 

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, दोषींवर कायदेशीर चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. “शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांची लूट सहन केली जाणार नाही. जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी बजावले.

 

या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सूतगिरणीतील गैरव्यवहाराबाबत मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी दोषींना वाचविण्याचा कोणताही प्रयत्न होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी बैठकीत मांडली.

 

बैठकीनंतर संबंधित विभागांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच चौकशीचा अंतरिम अहवाल सादर करून पुढील कारवाईला गती देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आटपाडी सूतगिरणी गैरव्यवहार प्रकरणी सरकार अत्यंत गंभीर असून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी व्यक्त केला.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here