
माणदेश एक्सप्रेस न्युज
इस्लामपूर : शिराळा तालुक्याच्या एका गावातील सहा वर्षे वयाच्या अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जयवंत उर्फ बाबज्या रामा शिरसट (वय ४६, रा. शिरसटवाडी) याला दोषी धरून येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दुसरे जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध थत्ते यांनी जन्मठेप व ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने ११ महिन्यांत या खटल्याचा निकाल देत नराधम आरोपीला कारागृहाची वाट दाखविली.
दंडाच्या रकमेतील ३५ हजार रुपये पीडित मुलीस देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. गेल्या वर्षी जून महिन्यात आरोपी जयवंत शिरसट याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. यावेळी मुलीच्या नात्यातील महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने त्याने पलायन केले. मुलीने ही घटना घरी सांगितल्यावर जयवंत शिरसट याच्याविरुद्ध कोकरूड पोलिसात फिर्याद देण्यात आली.
त्यावरून शिरसट याच्यावर बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला. पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास करीत शिरसट याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी न्या. थत्ते यांच्यासमोर झाली. न्यायालयाने शिरसट याला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, हवालदार उत्तम शिंदे, बजरंग खराडे यांनी सरकार पक्षाला मदत केली.
घटनेदिवशी पीडित मुलगी ही इतर मुलांसोबत खेळत होती. सायंकाळी ७ नंतर ही मुले घरी परतत होती. यावेळी आरोपी शिरसट याने पीडित मुलीस बाजूच्या झुडुपाजवळ घेऊन जात तिच्यावर अत्याचार करत होता. याचवेळी एका महिलेचे लक्ष गेल्याने तिने ओरडताच आरोपीने पलायन केले. या महिलेच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळून त्याला जन्माची शिक्षा भोगायची वेळ आली.
गेल्या वर्षीच्या १७ जूनच्या सायंकाळी ही घटना घडली. दुसऱ्या दिवशी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी गतीने तपास करीत आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात या खटल्याची १२ डिसेंबर २०२४ ला पहिली सुनावणी झाली. २९ मार्चच्या दुसऱ्या सुनावणीत ६ साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. आरोपीचे निवेदन आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने या खटल्याचा जलदगतीने निकाल देताना आरोपीची खैर केली जाणार नाही, असाच संदेश दिला.
या खटल्यातील पीडित मुलीचा जबाब न्यायाधीशांच्या कक्षामध्ये घेण्यात आला. यावेळी आरोपीची ओळख पटविण्याकरिता मुलीला आरोपीचा चेहरा व्ही.सी. द्वारे दाखविण्यात आला. त्याचा चेहरा पाहताच पीडित मुलगी दचकून बाजूला जाऊन रडू लागली. या घटनेतून पीडित मुलीच्या मनामध्ये आरोपीची दहशत किती खोलवर होती, याची देखील न्यायिक नोंद जिल्हा न्यायाधीश थत्ते यांनी घेतली.