
गोमेवाडीचे माजी सरपंच हंबीरराव जावीर यांचे यश
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : गोमेवाडी (ता. आटपाडी) येथील माजी सरपंच हंबीरराव जावीर हे वयाच्या ४८ वर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले. तेही ६३ टक्के गुण मिळवून. माजी सरपंच उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांच्या मित्र आणि कुटुंबीयांनी एकच जल्लोष केला.
हंबीरराव जावीर हे १९९४ मध्ये गोमेवाडी येथील गजानन हायस्कूलमध्ये दहावीला शिकण्यासाठी होते. परंतु, त्यांना त्यावेळी दहावीची परीक्षा देता आली नव्हती. त्यामुळे तिथेच त्यांच्या शिक्षणाला अडथळा निर्माण झाला. शिक्षण थांबल्यामुळे पुढे त्यांनी शेती आणि वाहन चालक म्हणून कामाला सुरुवात केली. हंबीरराव यांचा गावामध्ये जनसंपर्क मोठा असल्यामुळे त्यांनी गावाच्या राजकारणात सहभाग घेतला.
२००७ मध्ये ते प्रथम ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. २०१० मध्ये त्यांची गावाच्या सरपंचपदी वर्णी लागली. त्यानंतर ते १५ वर्षे गावात सदस्य म्हणून राजकारणात सक्रिय होते. यादरम्यान हंबीरराव यांचा विवाह झाला. पत्नी नंदाताई या बारावी उत्तीर्ण असून, मुलगी अंजली हिने एम.कॉम., तर मुलगा शुभम याने कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा रमाकांत सोहनी युवा मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला.