
प्राचार्य डॉ.शेखर मोहिते : वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात संस्थांतर्गत तपासणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
तासगाव : पालकांशी व विद्यार्थ्यांशी हितगुज साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षकांनी नवोपक्रम राबवावेत असे उद्गार सातारच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर मोहिते यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे संस्थातंर्गत पथक तपासणी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले शिक्षकांनी अपडेट राहिले पाहिजे. विद्या समितीच्या वतीने पथक तपासणीचे औचित्य साधून विवेकानंद परिवारात विचारांची देवाणघेवाण करण्याचा हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना एलबीएस कॉलेजच्या विज्ञान विभाग प्रमुख सौ.एम.एस.पाटील व ज्युनिअर विभागप्रमुख व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य प्रा.सुनिल शिंदे यांनी महाविद्यालयात राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांची शिस्त,शिक्षकांची शिकविण्याची तळमळ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,महाविद्यालयाची प्रसिद्धी, एमएचटी – सीइटी वर्ग, स्मार्ट क्लास रूम , इंटरऍक्टिव्ह बोर्ड इत्यादीमुळे महाविद्यालयाची गुणवत्ता वाढल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पथक तपासणी साठी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. दिवसभरात महाविद्यालयाचे निरीक्षण करून मूल्यमापन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाला शिवछत्रपती पुरस्कार व अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ.शेखर मोहिते व त्यांच्या टीम चा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रा.मेजर मोहन विरकर , प्रा.एम.एम.हांगे,प्रा. सौ.ए.ए.थोरात, प्रा.सौ.बी.एस.कालगावकर, प्रा.सौ.वासंती माने,प्रा.बी. एस.केदार, प्रा.पी.बी. पाचपुते,प्रा.पी.व्ही.बोराटे या टीमने महाविद्यालयाची तपासणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर प्रमुख एस.डी. पाटील यांनी केले तर आभार विज्ञान विभाग प्रमुख प्रा.पी.डी.पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.