
Collector Amba : मार्च महिन्यापासूनच आंब्यांनी बाजारपेठ व्यापते; लहान-मोठ्या आकाराचे हे आंबे असतात. त्यांचा आकार, गोडवा व नावांनी ते ग्राहकांना आकर्षित करतात. जिल्ह्याच्या बाजारपेठेत तसे बाहेरचेच आंबे येतात; परंतु जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातूनही ‘कलेक्टर’ आंबा राज्याच्या विविध भागातील बाजारात विक्रीसाठी जातो. कलेक्टर आंब्याची क्रेज नागपूर-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये असून, आपल्या गुणांमुळे तो रुबाब झाडत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यात कलेक्टर आंब्याच्या बागा आहेत. हा आंबा सर्व आंब्यांपेक्षा आकारात मोठा व वजनानेही जड आहे. आंब्यात गोडवासुद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागपूर, पुणे यासारख्या मोठ्या शहरांसह लहान शहरातील ग्राहक कलेक्टर आंबा खरेदीकडे ओढले जातात. काही जण तर फोनवर संपर्क साधून आंबा मागवतात, तर काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हा आंबा परजिल्ह्यांमध्ये पुरविला जातो. महाराष्ट्रसह तेलंगणा व आंध्र प्रदेशातही हा आंबा पोहोचविला जातो.
ब्रिटिश राजवटीत पश्चिम गोदावरीचे तत्कालीन कलेक्टर ग्लासफोर्ड यांनी बाहेरून आंब्याची कलमे आणून या भागात म्हणजेच सिरोंचा परिसरात लावली. कलेक्टरने कलम लावल्यामुळे हा आंबा कलेक्टर नावाने प्रसिद्ध झाला. सिरोंचा भागात बेगनपल्ली, दशेरी, लंगडा, तोतापरी, केसर, आदी प्रजातींचे आंबे बाजारात आहेत; परंतु कलेक्टर आंबा हा आकर्षणाचे केंद्र ठरतो.
कलेक्टर आंब्याचे फळ पूर्ण वाढ झाल्यानंतर दीड ते दोन किलोपर्यंत वजनाचे असते. प्रतिकिलो १५० ते २०० रुपये दर याप्रमाणे आंबा विक्री केला जातो. त्या काळात जेव्हा झाडाला पहिल्यांदाच आंबे लागले, तेव्हा फळांचा आकार पाहून नागरिक आश्यर्यचकीत झाले होते, असे जुने जाणकार सांगतात.