
माणदेश एक्सप्रेस/पुणे : एप्रिल महिन्यात वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे राजगड किल्ल्यावर पाण्याची आणि अन्नाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गडावर राहणाऱ्या माकडांसह इतर मुक्या प्राण्यांची अवस्था हालाखीची झाली आहे. मात्र या कठीण परिस्थितीत पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे यांनी या मुक्या जीवांसाठी एक देवदूत ठरवत स्वखर्चातून दररोज अन्न व पाणी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
जसा त्याचा जीव, तसाच माझा जीव..या भावना मनात ठेवत बापू साबळे यांनी गडावरील प्राण्यांसाठी स्वतःहून पुढाकार घेतला आहे. पर्यटकांची संख्या उन्हामुळे कमी झाल्याने माकडांना पूर्वीप्रमाणे उरलेले अन्न मिळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांनी स्वखर्चातून दररोज माकडांना अन्नपुरवठा सुरू केला आहे.
राजगडावरील पद्मावती माची व सदरेच्या मागील टाक्यांमध्ये काही प्रमाणात पाणी असले तरी बऱ्याच टाक्या आटू लागल्या आहेत. यामुळे पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. पद्मावती तलाव हा मोठा असला तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे मुक्या जीवांना पुरेसं पाणी मिळत नाही. स्थानिकांनी तलावातील पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवण्याची गरजही व्यक्त केली आहे.
उन्हाच्या झळांमध्ये झाडांची पाने सुकत चालली असून, जलस्रोत आटत आहेत. अशा परिस्थितीत बापू साबळे यांचं कार्य म्हणजे निसर्ग आणि जीवसृष्टीवरील प्रेमाचं जिवंत उदाहरण बनलं आहे. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हे माकड फक्त गडाचे नव्हे, माझेही साथीदार आहेत, असं म्हणत बापू साबळे यांचं हे कार्य एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.(स्त्रोत-लोकमत)