
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : बदलापूर येथील अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. हे एन्काऊंटर प्रकरण आता पोलिसांनाच भोवलं आहे. एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात शिंदेच्या वडिलांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवर वडिलांनी प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. एन्काऊंटरमध्ये जे पोलीस अधिकारी उपस्थित होते, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. एन्काऊंटरवेळी जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशावर वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली. असीम सरोदे म्हणाले, “अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस हे सॉफ्ट टारगेट आहेत. पोलिसांवर कोणी दबाव आणला, त्यांच्यावर दबाव आणून कोणी एन्काऊंटर करायला लावला? याची माहिती घ्यावी लागेल. याचे संदर्भ कुठे जातात त्यांची चौकशी करावी लागेल. त्यावेळी एन्काऊंटरचे फोटो काही नेत्यांनी लावले होते त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असंही वकील असीम सरोदे म्हणाले.