
माणदेश एक्सप्रेस न्युज
बारामती : मी नाराज वगैरे काही नाही. मला आता बाहेर बोलायचीच चोरी झाली आहे असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. बारामती कृषि विज्ञान केंद्राच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह पाटील यांनी कृषि विज्ञान केंद्राने एआय तंत्रज्ञान वापरून केलेली ऊस लागवड व अन्य प्रयोगांची पाहणी केली.
पाटील म्हणाले, मी जिथे वक्तव्य केले त्याचे संदर्भ पहा, शक्तिपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आला होता , तेथे बोलताना मी सांगितले होते की, लोक कालांतराने ‘कॉम्पेन्सेशन’ घेतात आणि गप्प बसतात. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे नक्की आहे का? तुम्ही हे शेवटपर्यंत नेणार आहात का..? आणि राजू शेट्टींनी याचा झेंडा हातात घेतला असल्याने काही काळजीच कारण नाही. खरं तर हा विनोदाचा भाग होता. राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना उभे राहिला सांगितले होते. त्यामुळे माझे काही तुम्ही गृहीत धरू नका. खरं धरू नका. तुमचं आंदोलन सुरू ठेवा, त्याला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यामागची भावना होती. मात्र मी नाराज आहे, मी पक्ष बदलतो आहे इथपर्यंत गाडी गेली. त्याचे स्पष्टीकरण मी तासातच दिले होते.
शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या नाराजीबद्दल सतर्क राहिले पाहिजे असे विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते, त्यावर जयंत पाटील म्हणाले, आम्ही सर्व एका कुटुंबीयातील आहोत. आम्ही एकमेकांना इशारे देत बसत नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वातला पक्ष आमचा आहे. आज आमचा पराभव झाला आहे. कदाचित निवडून आलेल्यांची संख्या कमी जरी असली तरी महाराष्ट्रात शरद पवार यांच्यासारखी, त्यांच्यावर प्रेम करणारी लाखो लोक आहेत, त्यांचा तो पक्ष आहे. आम्ही सर्वजण पक्षाच्या हिताचे निर्णय घेतो. एकट्याने इकडे जाणे तिकडे जाणे हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही. असेही पाटील यावेळी म्हणाले.