माणदेश एक्सप्रेस न्युज : म्हसवड : माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील एका वृद्धेला एका भोंदूबाबाने आपल्या गोड बोलण्याने भुरळ पाडली. हळूहळू त्याने तिच्याकडून घरातील सगळी माहिती काढून घेतली आणि त्या वृद्धेच्या घरातून निघून गेलेल्या मुलाची जागा घेतली. वृद्धेच्या मनाचा ठाव घेत त्याने वृद्धेला मीच तुझा निघून गेलेला पोरगा आहे, असं सांगत तिच्या पोराच्या नावाने शाळेतला दाखला मिळवला. वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नावावर असलेली ती तीन एकराची प्रॉपर्टी लुटायचा त्याने जणू डावच आखला होता. त्याच हव्यासापोटी त्याने वृद्धेच्या निघून गेलेल्या मुलाच्या नावे स्वतःच आधारकार्ड देखील काढलं आणि हळूहळू रेशनिंग कार्डमध्ये पण नाव लावून घेतलं.
ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला मिळवला. बँकेत खातं काढलं, चेकबुक मिळवलं. आता त्याची नजर त्या तीन एकरवर होती. मात्र, वृद्धेच्या निघून गेलेल्या मुलाच्या बहिणींनी आणि तिच्या नातवंडांनी त्याला आपला म्हणून स्वीकारलाच नव्हता. त्याने वृद्धेचा विश्वास संपादन करून हळूहळू आपला पाय पसरवायला सुरुवात केली. त्याला शिंदीमध्ये मोठा मठ बांधून राहायचं होतं. मात्र, वृद्धेच्या वारसांनी त्याचा मनसुबा हाणून पाडला.
गेल्यावर्षी त्या वृद्धेचा मृत्यू झाला, पोरगा नाही म्हणून नातवाने तिला पाणी पाजलं. नुकताच तिच्या मृत्यूला वर्ष झाले. वर्षश्राद्ध पण घातलं गेलं. पण या भोंदूबाबाला वृद्धेच वर्षश्राद्ध झालेलं माहीतच नव्हतं. त्याने मलवडी गावचे भजनी जमवले आणि शिंदी बुद्रूकमधील वृद्धेच्या घरी जाऊन परत वर्षश्राद्ध घालून भजन सुरू केलं. याचदरम्यान त्याला गेल्या कित्येक वर्षापासून शोधणारी वृद्धेची नातवंडं आयत्या वेळेला तिथं पोहोचली. त्याला तिथून त्यांनी दाखवलं ते थेट दहिवडी पोलीस स्टेशन.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पण मलवडी यात्रेचा बंदोबस्त करून नुकतेच पोलीस ठाण्यात पोहचलेले होते. ठाणे अंमलदारांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यावेळी सपोनि सोनवणे यांनी भोंदूबाबा आणि त्याच्या विरोधकांना त्यांच्या खोलीत बोलवले. त्यांनी विचारपूस सुरू केली. त्यावेळी त्यांना मृत वृद्धेच्या निघून गेलेल्या मुलाच्या बहिणी, नातवंडांनी आणि त्याने सांगितलेल्या वैयक्तिक माहितीत मोठी तफावत आढळली. यावेळी सोनवणे यांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, शांत असलेल्या त्याने आपलं मनोबल ढळू दिलं नाही. तो अशीही कोणतीच गोष्ट खरी सांगणार नाही, हे लक्षात येताच सोनवणे यांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला.
यावेळी त्याने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार तो जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील ओझर या गावचा रहिवासी आहे. एकनाथ रघुनाथ शिंदे (वय अंदाजे ४०) असं त्याचं नाव असून, तो २०१६ या सालापासून माण तालुक्यातील मलवडी येथील पांडू महाराजांच्या मठात यायचा. त्याठिकाणी दोन-चार दिवस राहून परत तो भ्रमंतीला जायचा. या भ्रमंतीदरम्यान त्याने शिंदी बुद्रुक येथील वृद्धेच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून तिचा विश्वास संपादन करून आपला हेतू पूर्ण करण्याच्या उद्देशाने अनेक पावले टाकली. मात्र, नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे आणि सपोनि अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे त्याचा हेतू मात्र हेतूच राहिला. दहिवडी पोलिसांनी त्याच्यावर वृध्द नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी आणि त्यांची प्रॉपर्टी हडप करण्याचा अनुषंगाने बनावट दस्तऐवज बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (स्रोत : मटा न्युज)