
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आटपाडी :
येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा संवाद मेळाव्यात जिल्हा युवक अध्यक्ष अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर हृदयस्पर्शी भाषण करत पक्षविस्ताराची नवी दिशा दिली. मेळाव्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख तसेच शेकडो युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात बोलताना अनिल पाटील म्हणाले की, “गेली दहा वर्षे कोणत्याही संविधानिक पदाशिवाय केवळ चळवळीच्या बळावर मी कार्यरत आहे. माझ्या अवतीभवती असलेले हे सर्व कार्यकर्ते माजी जिवाभावाचे सहकारी आहेत. मी देखील मंगळसूत्र चोरीच्या खोट्या गुन्ह्याला सामोरे गेलोय. पण अशा संकटांपुढे झुकलो नाही.”
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या अर्ध्या तासाच्या भेटीने मी पक्षात ताकदीने कार्य करत आहे. मतदारसंघातील आगामी निवडणुका या माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील, हे निश्चित आहे.
ते पुढे म्हणाले, “आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण स्वतःच्या हिमतीवर लढत राहिलो. २०२९ च्या निवडणुकीत आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी सल्लामसलत केल्याशिवाय निवडला जाणार नसल्याचा ठाम विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या मागण्या पुढे
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बोलताना अनिल पाटील यांनी मतदारसंघातील काही महत्वाच्या मागण्या मांडल्या :
मतदारसंघात डाळिंबावर प्रक्रिया करणारा मोठा उद्योग उभा करावा.
आटपाडी नगरपंचायतीचा प्रारूप विकास आराखडा तातडीने रद्द करावा.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून द्यावा.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करावा.
युवकांसाठी विशेष संदेश
युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “युवकांनी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करावं. परिस्थिती कठीण असते, पण त्यावर मात करणे हेच यश आहे.”
जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले यांचे मार्गदर्शन
संपूर्ण सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युवा फळी मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनबांधणीची प्रक्रिया सुरू असून, युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेवटी अनिल पाटील यांनी ठामपणे सांगितले की, “शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. पक्षाची झेंडा आणि विचार यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे.”