
माणदेश एक्सप्रेस/पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी किती रुग्णांना सेवा दिली, याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. गेल्या वर्षभरात शहरातील ५८ पैकी बारा रुग्णालयांनी एकाही गरीब रुग्णासाठी बेड राखीव ठेवले नाही की, नियमानुसार त्यांच्यावर अल्पदरात किंवा मोफत उपचार केले नाहीत.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते डिसेंबर २०२४ एका वर्षात पुणे जिल्ह्यातील ८६ हजार ८२६ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात जास्त उपचार सिंहगड डेंटल महाविद्यालय ॲंड हाॅस्पिटलमध्ये करण्यात आले आहेत, तर दीनदयाल मेमोरियल हाॅस्पिटल, एन. ए. वाडिया हाॅस्पिटलसह इतर बारा रुग्णालयांनी एकाही रुग्णावर मोफत उपचार केले नाही. धर्मादाय श्रेणीखाली शहरासह जिल्ह्यात ५८ रुग्णालयांची नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि निर्धन रुग्णांवर मोफत उपचारांसाठी १० टक्के बेड राखीव ठेवण्याचा नियम आहे; पण सर्रास रुग्णालयांत याची माहिती दिली जात नाही.
यामुळे गरीब व गरजू रुग्ण योजनेपासून वंचित राहतात. रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा गरीब व निर्धनांसाठी राखीव ठेवाव्या लागतात. या योजनेतील रुग्णांना उपचार, जेवण, कपडे, बेड व डॉक्टरची सेवा मोफत किंवा सवलतीच्या दरात द्याव्या लागतात. अशा रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यासही मनाई आहे. या योजनेवर नियंत्रणासाठी जिल्ह्याच्या धर्मादाय आयुक्तांसह जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी आदींची समिती काम करते.
धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशांनुसार संबंधित रुग्णालयावर ‘धर्मादाय’ असा ठळक उल्लेख अपेक्षित आहे. गरीब व निर्धन रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव असल्याचा फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. या योजनेची माहिती देणारा स्वतंत्र प्रतिनिधी आणि त्याचा संपर्क क्रमांक प्रदर्शित करणे आवश्यक आहे.