सांगली : कोविड-19 लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय तसेच खाजगी वैद्यकीय अधिकारी/डॉक्टर, कर्मचारी यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले. दि. 8 जानेवारी 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कवलापूर ता. मिरज येथे कोविड-19 लसीकरण रंगीत तालीम (Dry Run) कार्यक्रमाच्यावेळी त्या बोलत होत्या.
आरोग्य सेवेशी निगडीत असलेल्या सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, खाजगी डॉक्टर व रूग्णालयीन कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा इ. व्यक्तींचे कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत पहिल्या फेरीमध्ये लसीकरण होणार आहे. यावेळी सर्वांनी लसीकरण करून घेवून सहकार्य करावे.
प्रथम फेरीतील लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये लाभार्थ्यांना टोकन देण्यात येईल, लाऊड स्पिकर, पोस्टर, बॅनर, होर्डींग्जव्दारे लसीकरणाची प्रसिध्दी करण्यात येईल. लाभार्थींना जिल्हास्तरावरील कॉल सेंटर वरून दोन दिवस अगोदर लसीकरणाचा दिनांक व वेळ कळविण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
रंगीत तालीम (Dry Run) कार्यक्रमाच्यावेळी लाभार्थींसाठी प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष, ॲम्ब्युलन्स इ. सोयी उपलब्ध ठेवण्यात आल्या होत्या. लसीकरणानंतर गुंतागुंत आल्यास एईएफआय कीट, स्वतंत्र बेडची व्यवस्था, ऑक्सिजन व ॲम्ब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात आली होती. रूग्ण नोंदणी, आधार व्हेरीफिकेशन, लसीकरणानंतर आधार संलग्नता या व वरील सेवा प्रत्यक्ष लसीकरणावेळीही करण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये प्रा.आ. केंद्र कवलापूर, उप जिल्हा रूग्णालय इस्लामपूर व महानगरपालिका क्षेत्रामध्ये हनुमाननगर नागरी आरोग्य केंद्र येथे रंगीत तालीम घेण्यात आली.
यावेळी जि.प. आरोग्य समिती सभापती आशा पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, उपसभापती कवठेमहांकाळ निलमताई पवार, माजी उपसभापती कवठेमहांकाळ सविता शिंदे, माजी उपसभापती मिरज विक्रम पाटील तालुका आरोग्य अधिकारी मिरज डॉ. विजय सावंत, तालुका आरोग्य अधिकारी कवठेमहांकाळ डॉ. दत्तात्रय पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. अविनाश शितोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भूपाल शेळके, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्राकडील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस