मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. ‘लॉकडाऊनवर मला काही सूचना करायच्या होत्या, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांची समक्ष भेट घेणार होतो पण त्यांच्या आसपास अनेक कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे ते विलगीकरणात आहेत त्यामुळे आम्ही झूमवर संवाद केला,’ असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
‘मागच्या लॉकडाउनच्या वेळेला जेव्हा परप्रांतीय कामगार निघून गेले तेव्हा मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेंव्हा त्यांची मोजणी करा आणि कोरोना चाचण्या करा पण हे काही झालं नाही,’ असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोक आहेत. आणि त्या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे येत नाहीत,’ असं राज ठाकरे म्हणाले.
‘छोट्या उद्योगांनी त्यांचं उत्पादन चालू ठेवा पण त्याची विक्री होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, पण मुळात जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचं? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी,’ अशी मागणीही राज ठाकरेंनी केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस