मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुखांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केल्यावर जोरदार आक्षेप नोंदवला. अशाप्रकारे तुम्ही महाराष्ट्राची ओळख बदलण्याचा प्रयत्न करत आहात का? लोकांना महाराष्ट्रात येऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहात का? असा सवाल फडणवीसांनी विचारला. इतकच नाही तर एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तुम्ही किती आटापिटा करणार आहात, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. गृहमंत्र्यांनी डेलकरांच्या पक्षाचा उल्लेख केला. पण त्यांना वाझेंनी कुठल्या पक्षात प्रवेश केला होता, हे दिसलं नाही. सचिन वाझे आजही अधिकारपदावर आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता सरकार सांगत असेल की आम्ही चौकशी करु, तर तुम्ही त्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी मुभा देत आहात, असा गंभीर आरोपही फडणवीसांनी केलाय. या प्रकरणात सरकारचा खरा चेहरा दिसत असल्याची टीकाही फडणवीसांनी केलाय.
यावर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, “महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्यांचे नव्हे, तर पोलिसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर एवढा राग का काढत आहेत हेच समजत नाही. देवेंद्र फडणवीस एवढा राग का काढत आहेत याबाबतच्या राजकारणात जाऊ इच्छित नाही. परंतु, त्यांचे आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत.” मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशाप्रकारची भाषा कसे वापरू शकतात?” असा संतप्त सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
“महाराष्ट्र पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे म्हणून सामान्य माणसाचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास टिकून आहे. क्षुद्र राजकारणासाठी आपण या पध्दतीचे आरोप करून सामान्य जनतेचा विश्वास डळमळीत करू नका,” असे आवाहनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले.
देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही त्यांनी वाचून दाखवली आणि डेलकर यांना महाराष्ट्र सरकारवर विश्वास होता, म्हणून त्यांनी महाराष्ट्रात, मुंबईत येऊन आत्महत्या केल्याचं देशमुखांनी सांगितलं. इतकच नाही तर मध्यप्रदेशातील एका IAS अधिकाऱ्याने अशीच एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचा मुद्दाही देशमुखांनी उपस्थित केला. त्यानंतर मोहन डेलकर प्रकरणाची चौकशी आपण SIT कडे सोपवत असल्याची घोषणाही केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस