मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आठ वर्षे जुने प्रकरण बाहेर काढून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. यावर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांनी माझ्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करून दाखवावा,असे खुले आव्हान दिले आहे.
“शिवसेना प्रताप सरनाईकनी माझ्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करावाच. त्यांचा भ्रष्टाचार, घोटाळे उघड करण्याचा आमचा लढा सुरूच राहील.” असं सोमय्या यांनी ट्विट करून उघडपणे आव्हान दिलं आहे.
आठ वर्षांपूर्वीच हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश तत्कालीन महापालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, अद्यापही या अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नसल्याचेही सोमय्या यांनी सांगितलेले आहे. तसेच, प्रताप सरनाईक यांच्याविरोधात येत्या दोन दिवसांत सर्वसामान्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. खोपट येथील भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केलेले आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
