मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सचिन वाझे यांचे वकील आहेत, असे म्हणत असाल तर विरोधी पक्ष जल्लाद आहे का?, असा खरमरीत सवाल शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता विचारला आहे.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपलं. साधारणपणे अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा होते. विरोधी पक्ष त्यातील उणिवा दाखवतो, काही सूचना करतो आणि सरकारला मार्गदर्शनही करतो पण यावेळी विरोधी पक्षाने अधिवेशनावर नव्हे तर केवळ सचिन वाझे यांच्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती त्याचा राग काढण्याचे काम विरोधी पक्षाने अधिवेशनात केले. सचिन वाझे यांना निलंबित करा, वाझे यांना बडतर्फ करा, वाझे यांना अटक करा, अशा घोषणा देत विरोधकांनी कामकाज थांबवले.
आज तर सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही, मुख्यमंत्रीच त्यांचे वकील आहेत व ते वाझे यांना वाचवत आहे, असे विधान विरोधी पक्षनेत्यांनी केले आहे, असे नमूद करत परब यांनी भाजपवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांना सचिन वाझे यांचे वकील म्हणत असाल तर चौकशीआधी एखाद्याला शिक्षा द्यायला सांगणारा विरोधी पक्ष जल्लादाची भूमिका निभावत आहे आहे का?, असा सवाल परब यांनी केला. सचिन वाझे यांच्यापेक्षा अनेक महत्त्वाचे प्रश्न राज्यात आहेत. त्यावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. विरोधकांना जल्लादाच्या भूमिकेत पाहून आम्हाला फार वाईट वाटले, असा टीकेचा बाणही परब यांनी सोडला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस