मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र विरोधकांनी ‘हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की मुंबईचा?’, असा सवाल करत अर्थसंकल्पावर टीका केली. यावर मी 2009 ते 2014 पर्यंत एकूण 4 अर्थसंकल्प मांडलेले आहेत. याबरोबर जयंत पाटील, सुनील तटकरे यांनी देखील अर्थसंकल्प मांडले आहेत. अर्थसंकल्प मांडणे हे आमच्यासाठी नवीन नाही, असा सणसणीत टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला.
अजित पवार म्हणाले की, कराद्वारे येणारा पैसा कमी झाला आहे. केंद्र सरकारकडून अजूनही 32 हजार कोटी राज्याला मिळालेले नाहीत. त्यामुळे आमच्या सर्वांसमोर आव्हान होते. आम्ही सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत अर्थसंकल्प मांडला आहे.
शून्य टक्के व्याजाची घोषणा भाजपाची नाही. भाजपाची काय मक्तेदारी आहे का? आम्हाला काही कळतच नाही का? त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही काय साधूसंत नाही, असे जोरदार प्रत्युत्तर देखील त्यांन फडणवीसांच्या टीकेला दिले. विदर्भ, मराठवाडा विकास महामंडळांच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, त्यांनाच विदर्भाची काळजी आहे, मग आम्ही का बिन काळजीचे आहेत का?, असा सवाल देखील त्यांनी केला.
जनतेला सरकारबद्दल आपलेपणाची भूमिका वाटावी, हे आमचं काम आहे. आम्ही असा कार्यक्रम देणार जो जनतेला आवडला पाहिजे. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेनं आमचा विचार केला पाहिजे. नांदेड, पुणे, ग्रामीण भागातल्या रस्त्यांचा कार्यक्रम हे मुंबई महापालिकेत आहे का? मुंबई ही देशाची राजधानी आहे. तिच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे, असे अजितदादा म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस