पंढरपूर : आज प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुरायाच्या गाभार्यात केसरी झेंडू, पांढरा मोगरा आणि हिरव्या तुळशीच्या पानांचा वापर करून तिरंग्यामध्ये आकर्षक आणि मनमोहक अशी फुलांची सजावट केली आहे.
सजावटीमुळे देवाचा गाभारा आणि मंदिर अधिक खुलून दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विठुरायाला आज पांढऱ्या आणि लाल रंगाचा पोषाख परिधान करून गळयात तिरंग्याचे उपरणे घालण्यात आले आहे. तर रुक्मिणी मातेलाही केसरी रंगाची साडी परिधान करून तिरंग्याचे उपरणे आणि फुलांचा हार घालण्यात आला आहे. सभा मंडप, सोळखांबी आणि प्रवेश द्वारावर ही फुलांची सजावट करण्यात आली आहे.
आज साक्षात विठुराया देखील देशभक्तीने भरावल्याचे मंदिरात भासत आहे. देवाचे हे देखणे आणि लोभस रूप पहाण्यासाठी भाविकांनी ही आज मोठी गर्दी केली आहे.दोन दिवसांपासून पंढरीत भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने सर्व नियम पाळून भाविकांसाठी दर्शन खुले केले आहे. विना पास मुखदर्शन सुरू केल्याने भाविकांची संख्या वाढली आहे.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस
