सांगली : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील दुचाकी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद करून 14 दुचाकी जप्त केल्या. यामध्ये पोलिसांनी अमित दिपक मोहिते (वय १९, रा. ग्रामपंचायत जवळ करगणी), लक्ष्मण शहाजी चव्हाण (वय २१, रा.नंदीवाली बस्ती, बनपूरी रस्ता, करगणी), विजय सुखदेव निळे (वय 22, रा. डॉ.देशपांडे दवाखान्या मागे करगणी) यांना अटक केली आहे.
अधिक माहिती अशी, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तासगाव विभागात पेट्रोलिंग करताना घरफोडी, जबरी चोरी, दुचाकी चोरीच्या गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपींना तपासून गुन्हे उघड करण्यासाठी एक खास पथक तयार केले होते. त्यानुसार तासगाव विभागात पेट्रोलिंग करताना सहायक फौजदार अच्युत सुर्यवंशी यांना विना नंबर प्लेटच्या दोन दुचाकीवरून तिघे तरूण तासगाव शिवाजी पुतळा परिसरामध्ये संशयितरित्या दुचाकी विक्री करण्यासाठी ग्राहकाच्या शोधात थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावुन तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत तिघांनी करगणी (ता.आटपाडी) येथील असल्याचे सांगितले. तिघांच्या ताब्यात असलेल्या दोन दुचाकींबाबत विचारणा केली. तसेच कागदपत्रे मागितली. तेव्हा एक दुचाकी आटपाडी येथून चोरल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याजवळील काळ्या रंगाची दुचाकी ही वेगवगळ्या भागात दुचाकी चोरण्यासाठी वापरत असल्याचे समजले. तिघांची कसून सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगली, तासगांव, आटपाडी, सांगोला, माळशिरस या ठिकाणाहून दुचाकी चोरल्याचे सांगितले.
या दुचाकी अमित मोहिते आणि विजय निळे याच्या घराजवळ लपवून ठेवल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी करगणी येथे जाऊन पथकासह 14 दुचाकी जप्त केल्या. त्यांची एकुण किंमत 6 लाख 85 हजार रुपये इतकी आहे. तिघांना आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक दिक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गायकवाड यांच्या सुचनेनुसार सहाय्यक निरीक्षक फडणीस, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, अच्युत सुयवंशी, सतिश आलदर, अनिल कोळेकर, संदीप नलवडे, सागर टिंगरे, संतोष गळवे, मच्छिद्र बर्डे, जितेंद्र जाधव, संदीप गुरव, मुदस्सर पाथरवट, सोहेल कार्तीयानी, शशिकांत जाधव, बजंरग शिरतोडे यांनी ही कारवाई केली.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस