मुंबई : राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. भाजपाने या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून, महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत आज माध्यमांसमोर बोलाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. “कुणाला मंत्रीमंडळात ठेवायचं कुणाला काढायचं हे ज्या त्या पक्षाचं काम असतं. जे दोषी असतील, ज्याच्यापर्यंत ते धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.” असं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवलं.
पवार म्हणाले, चौकशीआधी कुणाला शिक्षा देणं योग्य नाही.”सचिन वाझे यांना बडतर्फ करण्यात आलंय. जर कुणी अधिकारी चुकीचा वागला, जर तो दोषी आढळला, तर सरकारनं कोणालाच पाठीशी घातलं नाही,” असं अजित पवार म्हणाले.
तसंच, गृहमंत्र्यांना हटवलं जाणार का, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं हे त्या त्या पक्षाचा प्रमुख ठरवतो. काँग्रेसकडून सोनिया गांधी, राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेत असतात.”राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद नाहीत, असंही यावेळी अजित पवार यांनी नमूद केलं.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस