मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे यावरुन कोणतेही राजकारण होता कामा नये, असेही राऊत यांनी म्हटले.
धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने काय भूमिका घ्यायची हे तेच ठरवतील. राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच सोडावे, असे राऊत यांनी म्हटले.
यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची आठवण करुन दिली होती. तेव्हादेखील गोपीनाथ मुंडे यांच्यावर असेच आरोप झाले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली होती, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
कोणत्याही व्यक्तीला राजकारणात शिखरावर पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. त्यामुळे एका क्षणात चिखलफेक करुन त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे. सर्व राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आम्ही ही गोष्ट शिकलो आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
