नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी फेब्रुवारी महिन्यातील घटनाक्रमच विशद केला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयात असल्याचे कागदपत्रंही त्यांनी सादर केले. सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पीटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईन चा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल पवारांनी केला.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड केली. गृहमंत्री फेब्रुवारीच्या संबंध महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असं सिंग कशाच्या आधारावर म्हणतात? असा सवाल करतानाच वाझे-देशमुख भेटीची माहिती चुकीची असल्याचा दावा शरद पवार यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही, अनिल देशमुख मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस