मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढा. नाही तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केलं आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी आघाडी सरकारवर टीका केली.सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा दरेकर यांनी दिला.
मराठा समजाचा आक्रोश थांबला असेल त्यांची ताकद संपली असेल असं सरकारला वाटत असावं. त्यामुळेच आंदोलनाचा आवाज या सरकारच्या कानावर जात नाही. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारचा एकही प्रतिनिधी आलेला नाही. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार असून केवळ मराठा समाजाला खेळवा-खेळवीचं राजकारण हे सरकार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. ठाकरे सरकारच्या मनात पाप आहे. सर्व भरत्या सुरू केल्या आहेत. सोंग आणि ढोंग करण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
