मुंबई : काहीवेळापूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार साधारण 12 वाजण्याच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊणतास चर्चा सुरु होती. या भेटीत सचिन वाझे आणि एनआयएचा तपास या दोन विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आता दुपारी चार वाजता शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचे कारण मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा असे सांगितले असले तरी या बैठकीत सचिन वाझे प्रकरणात डॅमेज कंट्रोल कशाप्रकारे करायचे, याविषयी चर्चा होणार असल्याचे कळते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आल्याची माहिती आहे. परमबीर सिंह यांना जो न्याय लावण्यात आला तोच अनिल देशमुख यांना लावण्यात यावा. हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे सरकारमधील काही नेत्याचे म्हणणे आहे.
अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरु असलेल्या चौकशीत API सचिन वाझे यांनी मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस