पुणे : समाज सुधारकांनी केलेल्या कार्याची नोंद त्यांच्या सामाजिक मूल्यांची ठेवण आपल्या शिक्षण पद्धतीत अंतर्भाव करणे ही काळाची गरज असून त्याचबरोबर शिक्षणपद्धती व अभ्यासक्रमांमध्ये अमुलाग्र बदल करून पुनर्रचना करणे अत्यावश्यक असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले.
राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून समाज कल्याण विभागाच्या विविध विकास योजना गती देण्यासाठी, विशेषतः शैक्षणिक योजनांमध्ये बदल करण्यासाठी फुले वाडा शैक्षणिक योजना हा उपक्रम राबविला जात असून त्याचे काल दि.१६/१२/२०२० रोजी पुणे येथील फुले वाड्यात शुभारंभ करण्यात आला. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक विचार या विषयावर बोलताना प्राध्यापक हरि नरके यांनी आपले विचार व्यक्त केले.
तत्कालीन परिस्थितीमध्ये प्लेग रोगाच्या साथीच्या काळात फुले दांपत्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा दाखला देत, सामाजिक कार्यासाठी शहीद झालेल्या या सर्वच समाज सुधारकांच्या समाजकार्याची नोंद आजच्या अभ्यासक्रमाद्वारे नवीन पिढीला करून देणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात समाज कल्याण विभागाने केल्याने मी त्यांचे विशेष धन्यवाद देतो. शासनाने नुकताच सावित्री उत्सव साजरा त्याचा निर्णय घेतला असून एक जानेवारीपासून सदर उत्सव राबविण्यात येणार असल्याचे प्राध्यापक नरके यांनी यवेळी सांगितले. शैक्षणिक योजनांमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने वस्ती पातळीवर जाऊन शिक्षण दिले पाहिजे, कौशल्यावर आधारित शिक्षणाचा समावेश झाला पाहिजे, त्याचबरोबर अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली पाहिजे, जादाचे कोचिंग क्लासेस आवश्यक आहे. समाजाचे विशेषता पालकांचे शिक्षण आवश्यक आहे, गाव तेथे ग्रंथालय अशी योजना राबविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे समाजामध्ये शिक्षणाबद्दल आस्था निर्माण करणे आवश्यक आहे. कामाचे मूल्य श्रम प्रतिष्ठा याचा देखील शिक्षणात अंतर्भाव होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यानी सांगत महात्मा फुले यांचे गळतीचे प्रमाणावरील १४ विचार आजच्या परिस्थीतीही लागु पडत असल्याचेही प्रा.हरी नरके यांनी शेवटी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी प्रगतीतील मनोसामाजिक अडसरांचे निर्मूलन या विषयावर सामाजिक कार्यकर्ते डॉ.हमीद दाभोळकर यांनी आपले विचार मांडताना शिक्षणामध्ये संस्कृती व वंशपरंपरा या जवळचा संबंध असून त्याकरिता मानसशास्त्राचे शिक्षण महत्त्वाचे असल्याचे मत श्री दाभोळकर यांनी यावेळी व्यक्त केले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत त्याचे मानसिक वातावरण टिकविणे गरजेचे असून वातावरणाच्या बदलांचा परिणाम विद्यार्थ्यावर होत असतो, त्यासाठी त्याला सामाजिक मूल्य व त्याची जाण निर्माण करणेसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे देखील महत्त्वाचे आहे.त्याचप्रमाणे खेळ कला मनोरंजन याला देखील शिक्षणामध्ये प्राधान्य देणे तितकेच महत्त्वाचे आहे. एकीकडे काही शाळा बंद होत आहेत तर दुसरीकडे नवीन शाळा सुरू होत आहेत हा विरोधाभास असला तरी त्याकरिता सामाजिक मानसिकता समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यात बदलांची गरज आहे मुलांचे मानसशास्त्र समजून घेतले तरच त्याला त्या पद्धतीने शिक्षण घेऊन त्याचा उपयोग समाजासाठी होऊ शकतो असेही डॉ.दाभोळकर यांनी शेवटी बोलताना सांगितले.
सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व गळती वरील उपाय या विषयावर शिक्षणतज्ञ श्री संदीप वाकचौरे यांनी यावेळी विद्यार्थ्याची शाळेत उपस्थित कशा पद्धतीने वाढवली जाऊ शकते त्याचबरोबर भटक्या जमाती चा शिक्षणाचा विषय कसा निर्माण झालेला आहे. यावर भाष्य करीत ज्यांच्यासाठी शिक्षण त्यांच्यापर्यंत शासन पोहोचणं आवश्यक आहे त्यासाठी वाडी-वस्ती केंद्रस्थानी मानून शासन मार्फत काम होणे आवश्यक असल्याचे श्री वाकचौरे यांनी सांगून परिस्थितीनुसार शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून सहज व बोलीभाषेत शिक्षण उपलब्ध झाले पाहिजेत. विद्यार्थ्याचा कल व अभिरुची समजून घेतली पाहिजेत त्यांच्या कलेला वाव देण्याची गरज आहे. ओरिसा, तामिळनाडू सरकार च्या शिक्षण पद्धतीचा दाखला देत महाराष्ट्रात देखील सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी त्यांना देखील इतर शिष्यवृत्ती प्रमाणे योजना लागू केली पाहिजे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.
सर्वांगिण विकास संकल्पना विकास प्रक्रियेतील इतरांची भूमिका, या विषयावर माजी शिक्षण उपसंचालक श्री विद्याधर शुक्ल यांनी आपले विचार मांडताना सांगितले शिक्षण पद्धतीमध्ये जीवन कौशल्य, स्व-व्यवस्थापन, स्व-अनुभव अत्यंत महत्वपूर्ण आहे. जीवन कौशल्य बरोबर शारीरिक कौशल्य देखील मुलांमध्ये रुजवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.विशेषतः लहान वयोगटातील मुलांची बोलण्याची कला शिक्षकांनी अवगत केली पाहिजे, त्यासाठी मुले समजून घेणे महत्वाचे आहे विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे कार्य होण्यासाठी शिक्षकाने देखील तितकीच महत्त्वाची भूमिका बजावणे महत्त्वाचे आहे. यासाठी निरंतर प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रोत्साहन दिले गेले पाहिजे ,माहितीचे विश्लेषण विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे तरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना साकार होईल असेही श्री.शुकल यांनी शेवटी बोलताना सांगितले.
सदर शिबिरात समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे हे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. श्री नारनवरे यांनी शिक्षणाच्या योजनांमध्ये बदल करण्याची गरज आहे का? याचा विचार होण्यासाठी व सामाजिक बदलाची सुरुवात करण्यासाठी फुले वाडा शैक्षणिक योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून सर्वप्रथम निवासी शाळांना फुले वाडा शैक्षणिक योजना लागू करणार असल्याचे सांगितले. सदर फुले वाडा शैक्षणिक योजना शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
सुमारे ३ तास चाललेल्या या शिबीराप्रसंगी समाज कल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप डोके ,सह आयुक्त भारत केंद्रे,उपसंचालक अनुराधा ओक,सहाय्यक आयुक्त संगीता डावखर, समाज कल्याण अधिकारी हरीश डोंगरे, यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबीराचे सुत्रसंचालन उपसंचालक अनुराधा ओक यानी तर सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यानी आभार व्यक्त केले.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस


