मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भांडुप येथील आगीच्या दुर्घटनेची पाहणी करावयास गेल्यानंतर आगीची पाहणी करणे, चौकशीची मागणी करणे हे आम्ही समजू शकतो. मात्र तिथे गेल्यानंतरही राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यास विरोधी पक्षनेते विसरले नाहीत. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यामुळे हे इतके विचलित झाले आहेत की मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला देखील ते विसरत नाहीत, अशी टीका शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी शुक्रवारी केली.
गृह विभागाचा जो अहवाल आहे, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वास्तविक जी प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा पूर्वीच्या सरकारमध्ये होती, तीच आता देखील आहे. सरकार बदलले तरी यंत्रणा तीच राहते, म्हणजे हे सर्व अधिकारी जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा हे सगळे चांगले होते. आता याच अधिकारी आणि पोलिसांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. सीताराम कुंटे यांच्यासारख्या मराठी आयएएस अधिकाऱ्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहेत. अशा अधिकाऱ्यांवरही ते आता अविश्वास दाखवत आहेत आणि त्यांची बदनामी करत आहेत, हे अतिशय घृणास्पद आहे, असेही कायंदे म्हणाल्या.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस