मुंबई : राज्यात MPSC ची पूर्वपरीक्षा येत्या २१ मार्च रोजी घेण्याचं राज्य लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, त्यानंतर देखील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. २१ तारखेला जर परीक्षा झाली नाही, तर मी या विद्यार्थ्यांसोबत वर्षा निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसेन”, असं पडळकर म्हणाले. तसेच, कोरोना काळात परीक्षा न झाल्यामुळे परीक्षार्थींसाठी २ वर्षांची वयोमर्यादा वाढवण्यात यावी, अशी देखील मागणी पडळकरांनी केली आहे.
“मुळात २०१९ला हे सरकार विश्वासघाताने सत्तेत आलं आहे. या सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमपैकी विश्वासघात हा एक प्रोग्रॅम आहे. कधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत, कधी धनगर समाजाला निधी देण्याच्या बाबतीत, कधी शेतकऱ्यांच्या बाबतीत, कधी लाईट बिलाच्या बाबतीत. या विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा पुढे ढकलून सरकारने विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावनेशी सरकार खेळतंय. माझ्यासोबत आंदोलनात असलेले विद्यार्थी लादेन समर्थक होते का? पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार का केला”, असं पडळकर यावेळी म्हणाले.
विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेवरून देखील पडळकरांनी टीका केली. “सरकारमधले मंत्रीच म्हणत आहेत की परीक्षा पुढे ढकलायला नको. एक मंत्री म्हणतात माझ्या परवानगीशवाय निर्णय घेतला. महाराष्ट्र सराकारची जत्रा आणि कारवाई सतरा अशी परिस्थिती आहे का? सरकारनं काल सांगितलं कर्मचाऱ्यांच्या टेस्ट आणि इतर तयारी व्हायची आहे. याचा अर्थ हे सरकार गाफील होतं”, असं ते म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस