सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विनामास्क संचाराची चर्चा सध्या राज्यभर आहे. सर्वसामान्यांबरोबरच राजकीय वर्तुळातूनही राज यांच्या या भूमिकेबद्दल अनेक प्रतिक्रिया येत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत यावर मत मांडलं आहे.
राज ठाकरे हे अलीकडेच नाशिक दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी फेसमास्क घातला नव्हता. त्याआधी २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत झालेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे सहभागी झाले होते. त्यावेळीही त्यांनी मास्क घातला नव्हता. पत्रकारांनी याबाबत विचारलं असता, ‘मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतो…’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मास्क न घालणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर राज्यात कारवाई केली जाते, तशीच नेत्यांवरही झाली पाहिजे. राज्य सरकारनं दिलेले आदेश सर्वांनीच पाळले पाहिजेत. राज ठाकरे यांनी देखील पाळले पाहिजेत. पण कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश राज यांना पाळायचे नसतील, म्हणून ते मास्क घालत नसावेत, असा तर्क आठवले यांनी मांडला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस