मुंबई : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या एका पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. परमबीर सिंह यांच्या या लेटरबॉम्बचे देशभरात पडसाद उमटले आहेत. भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनं केली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
‘शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघाले आहेत. जर, संजय राठोडांचा राजीनामा घेतला जात असेल आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही. वाझेंना निलंबित केलं जात आणि अनिल देशमुखांना वाचवलं जातं. प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी तुमच्यावर दबाब निर्माण करतेय की, सरकारची प्रतिमा बिघडतेय, राठोडांचा राजीनामा घ्या. मग मुंडेंमुळे सरकारची प्रतिमा डागाळली जात नाही का?,’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
तसंच, ‘देशमुखांचा राजीनामा घेतला पाहिजे. केवळ देशमुखच नाही तर शिवसेनेचे मंत्री गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. ते मंत्री कोण आहेत, त्यांचं नावही समोर आलं आहे. त्यामुळे मी दोन मंत्री म्हणालो होतो, दुसरे ते आहेत,’ असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
‘परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचा दावा गृहमंत्री करत असतील तर त्याची चौकशी व्हावी. गेल्या वर्षभरापासून सरकारला हप्ते योग्य पद्धतीने पोहोचत होते. अंबानी स्फोटक प्रकरणात नीट चौकशी झाली नाही याचा साक्षात्कार गृहमंत्र्यांना इतक्या दिवसानंतर झाला का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट माहिती नव्हती का? या गोष्टीची मुख्यमंत्र्यांना कल्पना नसेल तर मी कोरोनाला घाबरून मातोश्रीवर लपून बसलो होतो, हे त्यांनी मान्य करावे. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा माहिती नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा,’ असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस