नवी दिल्ली : “महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे.” असे ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
किसान आंदोलन झिंदाबाद! असे म्हणत संजय राऊत यांनी दुपारी एक वाजता गाझीपूरमधील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचं स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलकांशी चर्चा करतील तेव्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर काळ्या कृषी कायद्याची टांगती तलवार असता कामा नये. त्यामुळे हे कायदे रद्द करूनच शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे राऊत यांनी म्हटले.
शेतकरी हा काही राजकारणी नाही. तो त्याच्या भावी पिढ्यांसाठी लढतोय. हे शेतकरी कोणत्या प्रांताचे, धर्माचे किंवा जातीचे आहेत, हे महत्त्वाचे नाही. हा राष्ट्रीय लढा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
