नवी दिल्ली : हरयाणामधील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी संसदीय सचीव असणाऱ्या रामपाल माजरा यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. शेतकरी आंदोलनाला माझा पाठींबा असल्याचे माजरा यांनी जाहीर केलं आहे.
तीनदा आमदार राहिलेल्या माजरा यांनी इंडियन नॅशनल लोकदलला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये माजरा यांनी नवे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं होतं. किमान आधारभूत मूल्य भविष्यामध्ये कायम राहील की नाही यासंदर्भात माजरा यांनी शंका उपस्थित केली होती.
इतकच नाही तर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माझं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पूर्ण समर्थन आहे. मी या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहे, असंही माजरा यांनी म्हटलं आहे.नवीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुनच आपलं मत हे पक्षाच्या मतापेक्षा वेगळं असल्यानेच आपण पक्ष सोडल्याची माहिती माजरा यांनी दिली आहे.
राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजरा यांनी २६ जानेवारी रोजी दिल्लीत जे काही झालं, जी हिंसा झाली त्याचा मी निषेध करतो. माजरा यांनी यावेळी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. हे सरकार स्वत:ला राष्ट्रवादी सरकार म्हणवून घेतं त्यांना देशाची आन बान शान असणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भातील मर्यादा कायम राखता आली नाही, अशी खंतही माजरा यांनी व्यक्त केली. दिल्लीत झालेल्या हिंसेबद्दल दु:ख व्यक्त करताना माजरा यांनी घडलेल्या घटनेसाठी गुप्तचर विभाग सर्वाधिक दोषी आहे असंही माजरा यांनी म्हटलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
