सांगोला : डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन सांगोला येथे करण्यात आले होते. या महिला मेळाव्यात कोरोना काळात लोकांच्या हिताचे आणि जाणीव जागृतीचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशाताई, गाव पातळीवरील महिला कार्यकर्त्या, महिला पोलिस कर्मचारी आदींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी गटशिक्षण अधिकारी प्रकाश यादव, कृषी अधिकारी दिपाली जाधव, एकात्मिक बाल विकास सेवा योजेच्या प्रकल्प अधिकारी आसमा आतार, तालुका संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण, एड. राजेश्वरी केदार, डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे कार्यकारणी मंडलातील सदस्य प्रशांत कांबळे, संस्थेचे नंदू मोरे आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्वातीताई मगर होत्या. उपस्थितांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात स्वातीताई मगर म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्यांच्यामुळेच आज महिलांचा सहभाग सर्व क्षेत्रात दिसत आहे. महिला जरी विविध क्षेत्रात असल्या तरी त्यांचा निर्णय प्रक्रियेत अपेक्षित सहभाग दिसून नाही. महिलांच्या विकासाच्या अनुषंगाने अनेक धोरणे कायदे आहेत त्याचा वापर महिलांनी करून घेतला पाहिजे. सावित्रीबाई सारख्या महान व्यक्तींचे साहित्य वाचून त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करावा.
गट शिक्षण अधिकारी प्रकाश यादव यांनी सांगितले कि, महिलांचा शिक्षणातील सहभाग वाढला असला तरी अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अशा मुलींचा शिक्षणातील सहभाग वाढवा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
तालुका कृषी अधिकारी म्हणाल्या, महिलांचे प्रश्न खूप गंभीर आहेत. ज्या कामातून मूल्य मिळत नाही अशी अनेक कामे महिला करत आहेत. घर, शेती, जनावरे सांभाळणे आदी जबादारी त्या पार पाडत आहेत मात्र त्यांचा उचित सन्मान होताना दिसत नाही. शेतकरी महिला म्हणून अजून हि त्यांना अधिकार मिळत नाहीत. महिलांचे अधिकार त्यांना मिळवून देण्याची जबादारी सर्वांची आहे.
बाल विकास प्रकल्प अधिकारी आसमा आतार म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेची माहिती दिली. कामाच्या ठिकाणी महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार, बाल विवाह, स्त्री भृण हत्या सारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. यासाठी विविध कायद्याची माहिती महिलांनी करून घ्यावी व महिलांच्या मदतीला महिलांनीही धावून जावे असे ही त्यांनी सांगितले.
यावेळी एड. राजेश्वरी केदार यांनी सांगितले कि, आज महिला जरी अनेक क्षेत्रात असल्या तरी सामाजिक, आर्थिक व राजकीय पातळीवर अनेक प्रश्न आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक कायदे अस्तित्वात आहेत मात्र त्याची नीटशी माहिती महिलापार्यंत पोहचत नाही तसेच त्या कायद्याची अंमलबजावणी नीट होत नाही. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोना काळात तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, पोलीस कर्मचारी, आदींनी आहोरात्र काम केले आहे. त्यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात येत असल्याने आनंद व्यक्त केला.
तालुका संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण यांनी महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने असणाऱ्या विविध कायद्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना मोहिते यांनी केले त्यावेळी त्यांनी सांगितले कि, डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या वतीने दर वर्षी सावित्रीबाई जयंती महिलांचा सन्मान करून साजरी केली जाते. गत वर्षी कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. सर्व व्यवसाय, कार्यालये, शाळा कॉलेज बंद करण्यात आल्या. सर्वजण घरी असताना डॉक्टर, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी, आशाताई, गावातील पुरोगामी विचाराच्या महिला कार्यकर्त्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने समाजामध्ये काम करत होत्या. या महिलांचा सन्मान होणे आवश्यक असल्याने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे निमित्त महिलांचा सन्मान करण्यात येत असल्याचे हि त्यांनी सांगितले.
यावेळी निवडक महिला पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई व क्रीडा स्पर्धांमधून यश मिळवलेल्या मुलींनी आपली मनोगते व्यक्त केली. या मेळाव्यास उपस्थित असणाऱ्या सर्वच महिलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शर्मिला केदार, गोरक्ष गुरव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेश्वरी कोरे यांनी केले तर आभार शर्मिला केदार यांनी मानले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज