सांगली : मिरज येथील यशवंत सहकारी बँक लि. मिरज या अवसायन बँकेतील रुपये 1 लाखावरील ठेवीदारांच्या ठेव रक्कमेचे चेक वाटप जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्या हस्ते बँकेच्या प्रधान कार्यालयात करण्यात आले. यावेळी बँकेचे अवसायक सुनिल मारुती चव्हाण व माजी अवसायक मंडळ सदस्य अनिल सत्चिदानंद पैलवान, विशेष लेखापरीक्षक, वर्ग 2, सह. संस्था, (ग्राहक) कोल्हापूर तसेच बँकेचे ठेवीदार व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यशवंत सहकारी बँक लि. मिरज ही बँक दिनांक 29 जुलै 2009 रोजी अवसायनात काढण्यात आली. त्यावेळी एकुण 21341 ठेवीदारांची ठेव रक्कम 1456.64 लाख रुपये होती. त्यापैकी रुपये 1 लाखाच्या आतील 21341 ठेवीदारांची ठेव रक्कम 1146.38 लाख रुपये असून रुपये 1 लाखावरील 230 ठेवीदारांची ठेव रक्कम 310.26 लाख रुपये होती. अवसायक मंडळाने प्रभावीपणे कर्जवसुली करून रुपये 1 लाखाच्या आतील 5439 ठेवीदारांना 1060.79 लाख रुपये व रुपये 1 लाखावरील 190 ठेवीदारांना 50 टक्के रक्कम 157.28 लाख रुपये अशी एकुण 1218.07 लाख रुपये ठेव रक्कम ठेवीदारांना वाटप केली आहे. अद्याप रुपये 1 लाखावरील 157 ठेवीदारांची 152.98 लाख रुपये ठेव रक्कम वाटप करावयाची असून प्रातिनिधीक स्वरुपात यातील कांही ठेवीदारांना आज जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्याहस्ते ठेवीदारांना चेक वाटप करण्यात आले. अवसायनात निघालेली व रुपये 1 लाखावरील ठेवींची संपूर्ण परत करणारी सांगली जिल्ह्यातील ही दुसरी बँक ठरलेली आहे. सहकार खात्यांमार्फत 1 लाखावरील ठेवीदारांना प्रभावी कर्जवसुली करून न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे श्री. करे म्हणाले.
यशवंत सहकारी बँकेची अवसायन तारखेअखेर 3164 कर्जदाराकडून मुद्दल 827.50 लाख रुपये व व्याज 679.46 लाख रुपये अशी एकुण 1506.96 लाख रुपये कर्जे येणे बाकी होती. अवसायक मंडळाने एकुण 1518 कर्जदारांकडून मुद्दल 592.64 लाख रुपये व व्याज 377.14 रुपये अशी एकुण रुपये 969.78 लाखाची कर्जे वसुली केली आहे. ठेव विमा महामंडळ मुंबई यांच्याकडून विमा क्लेमची रक्कम 652.55 लाख रुपये बँकेस प्राप्त झाली होती. सदर विमा क्लेम रक्कमेची अवसायक मंडळाने पूर्णपणे परतफेड केली आहे.
श्री. करे यांनी बँकेचे अवसायक तसेच बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करून जिल्ह्यातील इतर बँकांच्या अवसायकांनी यशवंत बँकेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अशा पध्दतीने कामकाज करुन ठेवीदारांची 100 टक्के रक्कम परत करण्याचे आवाहन यावेळी केले.
बँकेचे ठेवीदार वसंत खाडीलकर यांनी त्यांची ठेव मिळाल्याबद्दल यशवंत सहकारी बँकेवरती ज्या विश्वासाने आम्ही ठेवी ठेवल्या होत्या त्या परत मिळाल्याने धन्यवाद व्यक्त केले. त्यांच्या हातामध्ये त्यांच्या ठेव रक्कमेचा धनादेश मिळताच ते भावूक झाले. बँकेचे अवसायक यांनी आवाहन करून बँकेच्या उर्वरीत ठेवीदारांनी बँकेशी संपर्क साधून त्यांच्या ठेवींची रक्कम लवकरात लवकर प्राप्त करुन घ्यावी, अशी विनंती केली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज