नवी दिल्ली : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांचे पडसाद संसदेमध्ये देखील पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील भाजप आणि अपक्ष खासदारांनी संसदेत वसुलीचा मुद्दा उपस्थित करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. खासदार नवनीत राणा यांनी देखील संसदेत आक्रमक भूमिका घेत शिवसेनेवर निशाणा साधला. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
‘तू महाराष्ट्रात कशी फिरते ते मी पाहतो, तुलाही जेलमध्ये टाकू’, अशा शब्दात धमकावले असल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच, पूर्वी शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
ज्या प्रकारे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली आहे. हा फक्त माझा अपमान नाही तर माझ्यासह संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे. त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस