पुणे : जिल्ह्याचे माहिती अधिकारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचं आज पहाटे कोरोनामुळं निधन झालं. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एक कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी व पत्रकारांचे मित्र असलेल्या सरग यांच्या अकाली निधनामुळं प्रशासकीय व माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
चार दिवसांपूर्वी सरग यांना ताप व खोकल्याचा त्रास सुरू झाला. खबरदारी म्हणून त्यांनी लगेचच करोना चाचणी करून घेतली. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं प्रकृती अधिकच खालावल्यानं त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
राजेंद्र सरग यांनी पुण्याबरोबरच बीड, अहमदनगर, परभणी अशा अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. व्यंगचित्र रेखाटन हा त्यांचा छंद होता.राजेंद्र सरग यांच्या पत्नीला देखील करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “पुणे जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सरग कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!” असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.