मुंबई : यापुढे महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएमबरोबरच मतपत्रिकेव्दारेही मतदान करण्याचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा कायदा करण्याच्या सूचना केल्या आहेत. जर हा कायदा राज्यात मंजूर झाला तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

याबाबत नाना पटोले यांनी विधानभवनात आज बैठकीचं आयोजन केलं होतं.भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 328 प्रमाणे राज्यातील निवडणुकांबाबत कायदा तयार करण्याचे अधिकार राज्य विधानमंडळाला आहेत. अनुच्छेद 328 नुसार राज्य विधानमंडळाला असलेल्या अधिकारानुसार कायदा तयार करुन राज्यातील जनतेला ईव्हीम व्यतिरिक्त मतपत्रिकेने मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या बैठकीत केल्या.
त्यामुळे इच्छेनुरुप, मतदार हे इव्हीएम किंवा मतपत्रिकाव्दारे मतदानाचा हक्क बजावू शकतील. त्यामुळे मतदानानुसार झालेली निवडणूक आणि निकाल, एकंदरीत सर्व प्रक्रिया यावरील जनतेचा विश्वास आणखी दृढ होईल आणि मतदानाची टक्केवारी देखील वाढेल, अशी भूमिका पटोले यांनी बैठकीत मांडली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
