पुणे : आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणात राज्यातील राजकारणी व उद्योजकांना एकमागोमाग एक नोटीस बजावणाऱ्या सक्तवसुली संचालनालयालावरच (ED) आता एका नोटिशीचं उत्तर देण्याची वेळ आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी ईडीला नोटीस बजावली आहे. ईडीनं आपले झेरॉक्सचे १ हजार ४४० रुपये थकवल्याची त्यांची तक्रार आहे.
अंजली दमानिया यांच्या तक्रारीच्या आधारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित भूखंड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. त्यासाठी ईडीने दमानिया यांचे वकील असीम सरोदे यांची मदत घेतली होती. चौकशी प्रक्रियेदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी हजारो कागदपत्रांची माहिती सरोदे यांच्या कार्यालयातून घेतली होती. ही माहिती देताना कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींचा खर्च ईडीला द्यावा लागेल, अशी अट त्यांनी घातली होती. ईडीनं त्यास मान्यताही दिली होती. प्रत्यक्षात मात्र अद्यापही तो खर्च सरोदे यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळं सरोदे यांनी नोटीस पाठवून थकीत पैशांची मागणी केली आहे.
सरोदे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी झेरॉक्सच्या बिलाची प्रत ईडीच्या अधिकृत ई मेलवर पाठवली होती. त्यानंतरही ईडीनं बिलाची रक्कम दिलेली नाही. त्यामुळं नोटीस पाठवण्यात आली आहे. सरोदे यांनी याआधीही ईडीच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
