मुंबई : केंद्र सरकार महाराष्ट्राला कोरोनाच्या लसीकरणासाठी पुरेशा लस मुद्दामहून उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. सोबतच, केंद्र सरकार पाकिस्तानला कोरोना लस पुरवत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पाकिस्तानधार्जिणे सरकार आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोलेंनी केली आहे.
राज्याला आवश्यक असलेल्या प्रमाणात लस दिल्या जात नाहीत. केंद्र सरकार हे महाराष्ट्र सरकारची वारंवार अडवणूक करत आहे. कोरोना संकट मोठे असताना पीपीई कीट, कोरोनासंदर्भातील वैद्यकीय साहित्य पुरवण्यासंदर्भातही अडथळे आणण्यात आले. लस पुरवण्यात केंद्र महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. केंद्र सरकार लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबवत आहे याची लवकरच आकडेवारीसह पोलखोल करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.
वाढीव वीज बिलाबाबत भाष्य करताना पटोले म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळातील वीजबिलांसंदर्भात लोकांच्या मोठ्या तक्रारी आलेल्या होत्या. यातून लोकांना दिलासा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. घरगुती आणि कमर्शियल विद्युत बिलाबाबतच्या धोरणावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. उर्जा विभागाकडून त्यांनी अहवाल मागवला असून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
मुंबई व महाराष्ट्राला भाजप वारंवार बदनाम करण्याचे काम करत असून गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील भाजप नेते काम करत आहेत, असा आरोप देखील पटोलेंनी केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस