मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “फासा आम्हीच पलटणार, शिडीशिवाय फासा पलटणार” असं वक्तव्य करत पुन्हा एकदा सत्तांतर करण्याबाबत वक्तव्य केल. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. “देवेंद्र फडणवीस यांना माझ्या शुभेच्छा” असं उत्तर देत राऊतांनी अधिक भाष्य करणं टाळलं.
राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच “आम्हीच फासा पलटवू, शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल” असं सूचक भाष्य फडणवीसांनी केलं होतं.

दरम्यान, नाना पटोले यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीका केलेली नाही, तर त्यांचं कौतुक केलंय, असं संजय राऊत यांनी अधोरेखित केलं. काँग्रेस पक्षातील संजीवनी देण्याचा उत्साह महत्त्वाचा आहे. काँग्रेस हा देशात सत्तेत नसला तरी महत्त्वाचा राजकीय पक्ष आहे. त्यांची परंपरा, इतिहास मोठा आहे. देशात या पक्षाला नवसंजीवनी मिळावी, ही आमचीही इच्छा आहे. परिवर्तन हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असं संजय राऊत म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
