बडोदा : टीम इंडियाचे ऑल राऊंडर हार्दिक आणि कृणाल पांड्या यांचे वडिल हिमांशू पांड्या यांचं निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने हिमांशू पांड्या यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही भावांनी सोमवारी वडिलांचा अत्यंविधी केला.
वडिलांच्या मृत्यूनंतर कृणालनी आपल्या दिवंगत वडिलांना इन्स्टाग्रामवर एक भावनिक पत्र लिहिलं आहे. कृणाल आणि हार्दिक या दोघांनीही या आधी अनेकदा आपल्या वडिलांचं माध्यमांसमोर तोंड भरून कौतुक केलं आहे.
‘प्रिय पप्पा, तुम्ही आमच्यासाठी काय आहात, हे सांगायला 100 पुस्तकही कमी पडतील. तुमच्यामुळेच आम्ही या उंचीपर्यंत पोहोचलो आहोत. तुम्ही आता आमच्यामध्ये नाही, हे स्वीकारणंही मला कठीण जात आहे. खूप साऱ्या चांगल्या आठवणी सोडून तुम्ही गेलात, मी जेव्हा तुमचा विचार करेन तेव्हा या आठवणींमुळे मी नेहमीच हसेन. आम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलीत. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलात, तसंच स्वत:वरही विश्वास ठेवायला शिकवलंत. तुमच्यासोबत भांडायला, तुम्हाला त्रास द्यायला, तुमच्यासोबत गॉसिप करायला मजा यायची. स्पर्धेसाठी जाण्याआधी आपण घराच्या खाली फोटो काढला, ही आपली शेवटची भेट असेल, हे हे मलाही माहिती नव्हतं. तुम्ही मला सोडून गेलात, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. ही पोकळी कशी भरून काढायची, हे मला कळत नाही. पण तुमचं आयुष्य मी सेलिब्रेट करेन, कारण तुम्ही आयुष्य जगलात. तुम्ही माझ्यासोबत कायम राहाल. हे घर तुमच्याशिवाय तसं कधीच नसेल. आम्हीही आता तुमच्याशिवाय तसेच नसू, पण तुम्ही जिकडे असाल तिकडून आम्हाला बघत असाल, जसे इकडेही आमच्याकडे लक्ष ठेवायचात. आयुष्याबद्दल खूप गोष्टी शिकवल्याबद्दल धन्यवाद. आमचा तुम्हाला अभिमान वाटेल, असंच आम्ही वागू. ढोसा मला तुमची कायमच आठवण येईल. माझे रॉकस्टार आणि माझे शिक्षक’
आतापर्यंत 4 लाख 63 हजारांहून अधिक जणांनी ही पोस्ट पाहिली आहे. तसंच ही पोस्ट व्हायरलही होत आहे.
