अहमदनगर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्कराच्या आरोपानंतर विरोधकांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. सोबतच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही. धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयात देखील यापूर्वीच अर्ज दाखल केलेला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. कुटुंबातील अंतर्गत बाब आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे, असे म्हणत त्यांनी राजीनाम्याची शक्यता फेटाळली आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर देखील असेच आरोप झाले होते. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणे योग्य नाही. मुंडे यांच्याबाबतही याबाबत चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे, असे ते म्हणाले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
