मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे असं पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावेळी पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत राणेंच्या मागणीची खिल्ली उडवली.
मासा पाण्याबाहेर काढल्यावर तो तडफडतो. सत्तेच्या बाहेर पडलेल्यांची अवस्था तशीच झाली आहे. त्यामुळे ते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असतात. राज्यात कधी राष्ट्रपती राजवट लागू होते आणि कधी आम्ही सत्तेत येतो असं विरोधकांना झालं आहे, असा चिमटा काढतानाच राष्ट्रपती राजवट लागूच करायची असेल तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये लावावी लागेल. त्यात या राज्यांचा नंबर वरचा आहे. त्यानंतर इतरही राज्य आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं इतकं सोप नाही, असं ते म्हणाले.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुनगंटीवार यांचं विधान लोकशाही विरोधी आहे. लोकशाही प्रक्रियेनुसार लोकांनी निवडून दिलेलं हे सरकार आहे. हे सरकार पाडण्याची भाषा विरोधक करत आहेत. विरोधकांनी सरकार पाडण्याची वल्गना करण्यापेक्षा किमान विरोधक म्हणून तरी काम केलं पाहिजे. अधिवेशन काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार येणार नाही हे स्पष्टपणे जाणवलं. विरोधातच राहावं लागेल असं त्यांना दिसून आलं. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून थोडंफार काम केलं. तेच विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनीही करावं, असा चिमटाही त्यांनी काढला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस