नागपूर : राज्य सरकारने ग्राहक आणि शेतकऱ्यांना वीज माफी देण्यासाठी तातडीने ऊर्जा खात्याला 10 हजार कोटी रुपये द्यावेत. त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा जमत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 78 लाख वीज ग्राहकांना वीज कापण्याच्या या सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत. या पूर्वी अशा घटना कधीच घडल्या नव्हत्या. त्यामुळे सरकारने ऊर्जा खात्याला तातडीने दहा हजार कोटी रुपये द्यावेत. ऊर्जा खात्याने ही रक्कम महावितरणला अनुदान म्हणून द्यावी. महावितरणने या रकमेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना अनुदान देऊन त्यांना दिलासा द्यावा. त्यांची वीज बिलं रद्द करावीत, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
सरकारने विनाविलंब या नोटीसा परत घ्याव्यात. शेतकरी आणि ग्राहकांचे वीज कनेक्शन कापू नये. आम्ही शेतकरी आणि ग्राहकांची वीज कापू देणार नाही, प्रत्येक घरासमोर उभं राहून सरकारी कारवाईला विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला.
आमच्याकाळात आम्ही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनगटात ताकद होती. पाच वर्षे शेतकऱ्यांची वीज कापणार नाही, असं फडणवीसांनी ठामपणे सांगितलं होतं. पण या मुख्यमंत्र्यांच्या मनगटात तसं सांगण्याची ताकद नाही. त्यामुळे त्यांनी जमत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
