मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे प्रकरणातील आरोपांना कलाटणी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी बोलताना आरोपांचं स्वरुप गंभीर असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता नवीन घडामोडी समोर आल्यानंतर शरद पवारांनी मुंबईत त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
“आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात अजून तक्रार समोर आल्यानंतर याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. पोलीस योग्य काम करतील असा विश्वास आहे. पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, पण आम्ही तपासात एसीपी दर्जाची माहिला अधिकारी असावी असं सुचवलं आहे. पोलिसांनी सर्वांशी चर्चा करुन वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करावा,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान गुरुवारी केलेल्या वक्तव्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “काल बोललो तेव्हा हे सर्व मला माहिती नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार करणं याची नोंद गांभीर्याने घेतली पाहिजे या भावनेने मी गंभीर शब्द वापरुन भूमिका घेतली. आता अधिक खोलात जाऊन वास्तव पुढे आणण्याची गरज आहे. कोणत्याही निर्णयावर येणं हा एखाद्यावर अन्याय करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही तपासातून येणाऱ्या निष्कर्षाची वाट पाहत आहोत”.
“आरोप करणाऱ्यावर एकापेक्षा जास्त आरोप झाले त्याबाबतही सत्यता जाणून घेण्याची गरज आहे. आरोप झाला म्हणून सत्तेपासून दूर व्हा असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्ण शाहनिशा करुन पुढची पावलं टाकणार आहोत,” असं सांगत शरद पवार यांनी धनंजय मुंडे पदावर कायम राहतील असं सूचक विधान केलं.
भाजपामध्ये दोन गट पडल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “भाजपाचं काय म्हणणं आहे माहिती नाही. काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे असं त्यांच्या मोठ्या नेत्याने म्हटलं आहे. त्यांच्याच पक्षातल्या माजी आमदाराने आपला अनुभव सांगितल्यानंतर भाजपा किंवा अन्य कोणी काय म्हणत असेल तर कदाचित ते टीका करण्याची संधी म्हणून करत असावेत. त्यावर काही बोलायचं नाही. हा त्यांचा अधिकार आहे”.
“ज्यांच्या हातातून सत्ता गेली आहे त्यांची अस्वस्थता समजू शकतो. ती गेल्यामुळे नाराजी असणार. त्यासाठी ज्यांनी हे सगळं काम केलं असेल त्यांना टार्गेट करुन त्यांना ठोकण्याचं काम करणं हे फारसं वेगळं समजत नाही. हे राजकारणात आक्रमकपणे आरोप करणं आणि भूमिका घेण्याचा भाग आहे,” असा टोला शरद पवारांनी भाजपाला लगावला.
एफआयआर दाखल होत नसल्याच्या तक्रारदार महिलेच्या आरोपावर ते म्हणाले की, “ही दोन तीन उदाहरणं आली नसती तर वेगळी चर्चा झाली असती. साहजिकच तपास करणाऱ्यांना अधिक काळजीने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही यावर भाष्य करण्याची गरज नाही. मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, ते सत्य समोर आणतील”.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
