मुंबई : सचिन वाझे यांची नियुक्ती करू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटलो होतो,” असा गौप्यस्फोट समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी केला आहे.
अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलत असताना हा गौप्यस्फोट केला. आझमी यांनी वाझे यांच्या नियुक्तीवरून सरकारवर टीका केली असून, याला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. “वाझेंची नियुक्ती होणार असल्याचं कळल्यानंतर मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांना वाझेंना पोलीस दलात घेऊ नका, अशी विनंती केली होती,” असं आझमी म्हणाले .
“सचिन वाझे यांचे कॅरेक्टर पहिल्यापासून वाईट आहे. त्याला परमबीर सिंह दोषी आहेत. पैसे वसुली प्रकरणात सिंह यांनाच जबाबदार ठरवलं पाहिजे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी जर अधिकाऱ्यांना पैसे वसुलीचं टार्गेट दिलं होतं. तर सिंह यांनी पवार आणि मुख्यमंत्र्यांना का सांगितलं नाही. सिंह यांनीच पैसे वसुली केली आहे. त्यांच्याविरोधात पैसे वसुलीच्या अनेक केसेस सुरू आहेत,” असा दावाही आझमी यांनी केला.
“ख्वाजा युनुस हत्या प्रकरण सुरू असताना वाझेंना पोलीस दलात घेणं ही महाविकास आघाडीची सगळ्यात मोठी चूक होती. तसेच मी सत्तेत असूनही सांगतो की, ज्या दिवशी वाझेंचा विषय विरोधकांनी हातात घेतला, त्याच दिवशी त्यांना निलंबित करायला हवं होतं. पण वाझेंना निलंबित करण्यात आलं नाही. ही सरकारची दुसरी मोठी चूक होती,” अशी टीका आझमी यांनी केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस