इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं विधान केलं आहे.सांगलीतील इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी त्यांची राजकारणातील इच्छा बोलून दाखवली आहे.
इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे.”दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे”,असं स्पष्ट विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना जयंत पाटील यांनी यावेळी राजकीय भानही जपलं आहे.
“आमच्या पक्षाकडं सध्या ते पद नाही. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवणे गरजेचं आहे. ती संख्या पुरेशी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जो निर्णय घेतील तो मान्य असेल,” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. मंत्रीपदापेक्षा प्रदेशाध्यक्षपद भावतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर येताच, राष्ट्रवादीतून त्यांना पाठिंबा मिळाला आहे. ‘जयंत पाटील यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असेल तर मी पाठिंबा देतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
