आटपाडी : सांगली शहरात व जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी अन्न-औषध प्रशासनाच्या वतीने पान दुकानदारांच्यावर ३२८ कलम लावुन त्यांना जेल मध्ये टाकून त्यांची दुकाने सील करण्याची कारवाई चालु आहे. या कारवाईमुळे पान दुकानदारांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुटख्याची तस्करी करणान्या धन-दांडग्यांच्यावर कारवाई न करता गोरगरीब पान दुकानदारांना वेठीस धरण्याचे काम चालू आहे. याचे निषेधार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या दिनांक १६ रोजी पानपट्टी चालकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून सदर मोर्चास आटपाडी तालुक्यातील सर्व पानपट्टी चालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आटपाडी तालुका पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष विजय लोखंडे यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यात ७ हजार पान दुकानदार व महाराष्ट्रात १० लाख पान दुकानदार आहेत. या व्यवसायावर महाराष्ट्रात सुमारे २ कोटी लोकांचा उदर निर्वाह चालतो. महाराष्ट्र शासनाने या लोकांच्या रोजीरोटीचा विचार न करता गुटखा व सुगंधी तंबाखू विक्रीवर बंदी घालून हा व्यवसाय मोडकळीस आणला आहे. राज्य शासनाने २०१२ ला गुटखा बंदी केल्यानंतर या निर्णयाचे स्वागत केले. दोन ते अडीच वर्ष पान दुकानदार गुटखा विकत नव्हते. परंतु हा गुटखा किराणा दुकानदार इतर व्यावसायिक विकत आहेत, त्यांच्यावर मात्र कारवाई केली जात नाही. राज्य शासन व प्रशासनाला खरोखर गुटखा बंद करायचा असेल तर इतर राज्यातुन येणाऱ्या महाराष्ट्राच्या सीमेवरच कारवाई करावी व सुगंधी तंबाखु विक्रीवरील बंदी उठवावी. तरी अन्न-औषध, प्रशासन विभागाने पान दुकानदारांच्यावर चालु केलेली कारवाई त्वरीत थांबवावी.
या मागण्यासाठी मंगळवार दि. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता चिंतामणराव कॉलेजच्या गेट जवळ एकत्र येवून जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे मोर्चा आयोजित केला आहे. तरी आटपाडी तालुक्यातील सर्व पानदुकानदार, फेरीवाले या सर्वांनी आपला व्यवसाय बंद करुन या मोर्चात प्रचंड संख्येने सामील व्हावे तसेच या मोर्चासाठी प्रदेशाध्यक्ष अजित सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ जमादार, म.न.पा. क्षेत्र अध्यक्ष एकनाथ सुर्यवंशी, जिल्हा सचिव मकरंद जमदाडे, जिल्हा खजिनदार राजु पागे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक कारंडे, सचिव म.न.पा. क्षेत्र राजकुमार खोत, सरचिटणीस म.न.पा. क्षेत्र मन्सूर नरवाडे आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस